‘इसिस’च्या रडारवर महाराष्ट्र!
रायायनिक हल्ला करून करायचे होते हत्याकांड
दहशतवादविरोधी पथकाने उधळला डाव
‘इसिस’ ही दहशतवादी संघटना आता भारतातही आपले हातपाय पसरू पाहात आहे. हिंदुबहुल लोकसंख्या असलेल्या भारतात त्यांना दहशतवादी कृत्ये करायची आहेत. त्यासाठी ते संधीच्या शोधात आहेत. नवनवीन क्लृप्त्या योजून ते आपल्या कामाला अंजाम देऊ पाहात आहेत. मात्र अद्याप तरी त्यांना त्यांच्या कामात यश आलेले नाही.
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेला जगभर आपले जाळे पसरायचे आहे. सध्या ही संघटना काही देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. कित्येक निष्पाप जीवांच्या हत्येचे पातक त्यांच्या माथी आहे, पण त्याची त्यांना बिलकूलही फिकीर नाही. उलट त्यांचा हा नरसंहार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना आकर्षित करून खोट्या विचारधारेवर आधारित साम्राज्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यातूनच भारतातील काही माथेफिरू तरुणही त्यांच्या जाळ्यात ओढले जात आहेत. नुकतीच संशयित दहशतवादी म्हणून अटक केलेले दहा जण तसेच याआधीही अनेकदा पकडलेले संशयित दहशतवादी हे त्यापैकीच आहेत. त्यांना ‘इसिस’ या संघटनेचे आकर्षण वाटत होते आणि त्यातूनच ते या संघटनेसाठी काम करीत होते.
‘इसिस’ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक आणि सिरीया’ हे या संघटनेचे पूर्ण नाव होय. कधी काळी इराकमध्ये आयएसआयएस ही संघटना अल-कायदा म्हणूनच ओळखली जात होती. मात्र २००६ मध्ये अमेरिका आणि स्थानिक अमेरिकन सैनिकांनी अल-कायदाचा पाडाव केला. त्यांना या संघटनेचा खात्मा झाला असे वाटत असले तरी ती पूर्णपणे संपली नव्हती.
२०११ मध्ये हा ग्रूप पुन्हा तयार झाला. त्यांनी इराकच्या तुरुंगात असलेल्या अनेक कैद्यांना सोडवले आणि हळूहळू स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केली. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये या संघटनेने अल-कायदाच्या छत्रछायेतून बाहेर पडत आयएसआयएस (इसिस) नावाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
आजपर्यंतच्या दहशतवादी संघटनांच्या तुलनेत ही संघटना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढवण्यात आघाडीवर आहे. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून नरसंहाराची छायाचित्रे पोस्ट करत असत. पूर्वी त्यांनी एक अॅप लाँच केले होते. या अॅपच्या माध्यमातून सीरिया, इराक आणि मुस्लिम जगतातील बातम्या दिल्या जात असत. ज्या दिवशी इसिसने मोसूल शहरावर ताबा मिळविला, त्या दिवशी या अॅपच्या माध्यमातून ४० हजार ट्विट केले गेले होते. त्यानंतर देशभरातील माथेफिरू मुस्लीम तरुण या संघटनेकडे आकर्षिले जाऊ लागले. दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की, त्यामध्ये उच्चशिक्षित तरुणही मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतात.
या संघटनेसाठी काम करणारे भारतातील काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून काम करीत असल्याचे आणि त्यांना भारतात दहशतवादी कारवाया करायच्या असल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या संघटनेसाठी काम करणाऱ्या अनेक माथेफिरू तरुणांची दहशतवादविरोधी पथकाकडून धरपकड करण्यात येऊन त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य दहशतवादी कारवाया रोखल्या गेल्या. आताही दहा संशयित दहशतवाद्यांना मुंबईजवळील मुंब्रा आणि औरंगाबाद या शहरांमधून जेरबंद करून एटीएसने म्हणजेच दहशतवादी पथकाने फार मोठे कार्य केलेले आहे.
ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबाद येथून अटक झालेल्या ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयितांकडून एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांनी कुंभमेळा तसेच मुंबई, ठाणे, औरंगाबाद आदी शहरांतील गर्दीच्या ठिकाणी रासायनिक हल्ला करून फार मोठे हत्याकांड घडवण्याचा कट आखला होता. अन्नपदार्थ किंवा पाण्यामध्ये रासायनिक पदार्थ मिसळून त्यांना हे हत्याकांड घडवायचे होते. त्यासाठी शहरांना पाणीपुरवठा करणारे जलसाठे लक्ष्य करण्यासाठी या सर्व दहा संशयितांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. मुंब्रा येथून प्रजासत्ताक दिनी अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी , तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिक हा पट्टीचा पोहणारा असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
त्याआधी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २२ जानेवारी रोजी मुंब्रा आणि औरंगाबाद येथे छापे टाकून मझहर शेख, जम्मन खुठेऊपाड, सलमान खान, फहाद अन्सारी, मोहम्मद मोहसीन सिराजउल्लाह खान, मोहम्मद तकीउल्लाह सिराज खान, काझी सर्फराज, मुशाहेदूल इस्लाम ऊर्फ तारेख यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली. प्रजासत्ताक दिनी अटक करण्यात आलेला , तलाह ऊर्फ अबूबकर पोतरिक हा पाणबुडा असल्याचे उघड झाले आहे. सलमान हा देखील पोहण्यात तरबेज असून तो या सर्वांना कुर्ला आणि मुंब्रा येथे जलतरणाचे धडे देत होता. पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा या दहा जणांचा कट होता. त्यासाठी त्यांनी ठाणे आणि औरंगाबाद येथील जलसाठे लक्ष्य करण्याचा कट रचला होता. पाणीसाठ्यात विष मिसळण्यासाठी गरज पडल्यास पोहता यावे यासाठी हे सर्व प्रशिक्षण घेत होते. एटीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये या सर्वांची पोलखोल झाली. ‘सलमान आम्हाला फुटबॉल शिकवायचा’, असे उत्तर नऊ जणांनी चौकशीत दिले. मात्र पोलिसांनी फुटबॉलचे नियम विचारले त्या वेळी सर्वांची बोलती बंद झाली. नियम सांगता येत नसल्याने हे सर्व खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
अटक करण्यात आलेले दहा जण उच्चशिक्षित आणि टेक्नोसॅव्ही आहेत, हे विशेष. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट यांसह ते टेलिग्राम या अॅपचाही वापर करत होते. तीनही अॅपचा वापर करून त्यांनी विविध ग्रुप तयार केले होते. यामध्ये आणखी काही तरुण आहेत. त्यापैकी काहींची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही संशयित एटीएसच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फुटबॉल शिकण्याच्या नावाखाली हे सर्व जण कुर्ला किंवा मुंब्रा या ठिकाणी एकत्र येत. फुटबॉल केवळ निमित्त असायचे. एकत्र जमल्यावर सीरियातून ‘इसिस’चा हस्तक जिहादच्या नावाखाली त्यांची माथी भडकवायचा. विषप्रयोग मोहीम यशस्वी फत्ते केल्यास सीरियामध्ये नेऊन आणखी मोठी जबाबदारी दिली जाईल, असेही या तरुणांना सांगण्यात आले होते.
दहशतवादविरोधी पथकाने ऐन प्रजासत्ताक दिना दिवशी मुंब्रा येथे जाऊन उमत मोहम्मदिया ग्रुपच्या संपर्कात असलेल्या तलाह ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरिक या २४ वर्षीय तरुणास अटक केली होती. त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राऊटर, काही मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केला आहे. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्त्वाच्या धाग्यादोऱ्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
एटीएसच्या अधिकाºयांनी या साºयांची चौकशी सुरू केली आहे. या संशयितांपैकी सलमान, मोहसीन आणि तकी हे तिघे भाऊ असून ‘इसिस’कडे आकर्षित झालेले आहेत. हे तिघे इतर तरुणांचा देखील ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी ब्रेन वॉश करत होते. मोहसीन हा सर्वात मोठा भाऊ असून तो मुंब्य्रातील सर्व सदस्यांवर देखरेख ठेवत होता. मोहसीन हा २६ जानेवारीला अटक केलेल्या तलाहच्या संपर्कात होता, असे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तलाह हा यापूर्वी विक्रोळी येथे राहत होता. मात्र सात-आठ महिन्यांपूर्वीच तो मुंब्रा येथे राहण्यास गेला होता. या संशयितांच्या सातत्याने बैठका होत होत्या. त्या बैठकांमध्ये तलाह हाही सामील असायचा. त्यामुळे रासायनिक हल्ल्याचा जो काही डाव शिजत होता, त्याची माहिती त्यालाही होती. सुरुवातीला जे नऊ संशयित पकडण्यात आले होते, त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तलाहचे नाव समोर आले होते. त्यामुळेच त्याची नंतर म्हणजेच प्रजासत्ताक दिनी धरपकड करण्यात आली होती. तलाह हा स्वत: उच्चशिक्षित आहे, तसेच त्याचे वडीलही उच्चशिक्षित असून ते दुबई येथे असतात, अशीही माहिती प्राप्त झालेली आहे.
मुंब्रासह कुर्ला येथे एका क्लबमध्ये फुटबॉल खेळण्याच्या निमित्ताने एकत्र येणाºया या संशयित तरुणांकडून क्लबमधील अन्य काही तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्न झाला आहे का? या दिशेनेही एटीएस आता तपास करीत आहेत. मुंबईसह मुंब्रा, औरंगाबादमधील संशयितांकडे एटीएस कसून चौकशी करत आहेत. या संशयित दहशतवाद्यांना आॅगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद शहरातील गर्दीच्या ठिकाणी घातपात करायचा होता. म्हणजेच १५ आॅगस्टदरम्यान किंवा २६ जानेवारी या भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिवसांच्या दरम्यानच त्यांना हे कृत्य करायचे होते. १५ आॅगस्टला भारत स्वतंत्र आला होता, तर २६ जानेवारी हा दिवस भारत प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. याच कालावधीत फार मोठे हत्याकांड करून त्यांना भारताला धडा शिकवायचा होता. वास्तविक हे तरुण भारताचेच नागरिक आहेत, मात्र ‘इसिस’च्या जाळ्यात फसून ते आपल्या मायभूमीतच घातपात करायच्या कारवाया करू पाहात आहेत, याला काय म्हणावे? भारतात दहशतवादी कारवाया करण्यासंदर्भातील उमत मोहम्मदिया ग्रुपने कट रचला असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती, त्यातूनच ही मोठी धरपकड करण्यात आली होती. एटीएसला मिळालेल्या या माहितीच्या आधारे त्यांनी उमत मोहम्मदिया ग्रुपवर लक्ष ठेवले होते.
या संशयित दहशतवाद्यांविरोधात पोलीस निरीक्षक विजयकांत जैस्वाल यांच्या तक्रारीवरून या दहाही जणांविरोधात भा.दं.वि. १२० ब, १८, २०, ३८, ३९, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा १९६७ सुधारणा २००४, २००८ सह १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९६७ सुधारित २००८ नुसार मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्य्रातील दोस्ती प्लॅनेट एमरॉल्ड टॉवरमध्ये आजोबांच्या घरी (आईच्या वडिलांकडेच) राहून तलाह हा दहशतवादी कट रचत होता. त्याच्यासोबत आजोबा, आई राहत असे, तर वडील नोकरीच्या निमित्ताने दुबईत वास्तव्याला आहेत, अशी माहिती एटीएसने दिली आहे. धर्माच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना आकर्षित करून खोट्या विचारधारेवर आधारित साम्राज्य निर्माण करण्याचे या संघटनेचे ध्येय आहे. मात्र त्यांचे हे ध्येयच त्यांना कधी न कधी तरी खड्ड्यात घालणार आहे आणि तो दिवस लवकरात लवकर येवो आणि हा निष्पाप रक्तसंहार थांबो, हीच अपेक्षा.
०००
Comments
Post a Comment