मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात होतेय कोट्यवधींची फसवणूक
आजकाल लोकांना झटपट पैसा हवा आहे... मेहनत कमी आणि पैसा जास्त मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक जण करताना दिसत आहे. लोकांची ही मानसिकता ओळखून काही महाभाग गंडा घालण्याचे  आपले नवनवीन फंडे वापरताना दिसतात आणि भोळेभाबडे लोकही त्यांच्या फंड्यांमध्ये आपसूकच फसतात. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या महानगरांमध्ये अलीकडच्या काळात अशा फसवणुकीच्या घटना वारंवार घडताना दिसत असून फसवणूक झाल्यानंतर लोक पोलीस ठाण्याची पायरी चढत असल्याने पोलिसांचीही अशा प्रकरणांचा छडा लावताना कसोटी लागत आहे.
मुंबईमध्ये एकेकाळी शेरेगर प्रकरण खूपच गाजले होते. अगदी अल्पावधीत पैशांची दामदुप्पट करण्याचा फंडा या महाभागाने अवलंबला होता. असंख्य लोक त्याच्या नादाला लागले होते. सुरुवातीला लोक पैसे गुंतवत असल्याने काही लोकांना त्याचा फायदा झाला खरा, मात्र तोच दामदुप्पट झालेला पैसा अधिक पैशांच्या लालसेने पुन्हा त्याच ठिकाणी गुंतवल्याने असंख्य लोकांचे गुंतवलेले सर्वच पैसे डुबले होते. ही घटना  तशी ताजी असतानाच अशाच प्रकारच्या गुंतवणुकीवर दामदुप्पटीने पैसे मिळवून देण्याच्या अनेक योजना मध्यंतरीच्या काळात येऊन गेल्या. काही काळातच लोकांच्या लाखो-करोडो रुपयांना चुना लावून संबंधित मंडळी फरार तरी झाली किंवा सध्या तुरुंगाची हवा तरी खात आहेत.
आताही  गुंतवणुकीवर कमी दिवसांत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून असंख्य लोकांची फसवणूक करण्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. मुंबई
, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेकांना चुना लावणाऱ्या या व्यक्तीने यापूर्वी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्येही अशाच प्रकारे लोकांना फसवण्याचेत्यांची आर्थिक लुबाडणूक करण्याचे काम केले होते. तेथे सुमारे ३०० जणांना फसवल्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती.
जयंत झांबरे-पाटील असे या व्यक्तीचे नाव आहे. या इसमाने आपल्या पत्नीसह एका कंपनीची स्थापना करून उपराजधानी नागपूरमधील लोकांना अल्पावधीत जास्त रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. मात्र कालांतराने लोकांची फसवणूक झाल्यानंतर त्याच्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्या होत्या. पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणात हे दाम्पत्य अलीकडेच जामिनावर सुटले होते. जामिनावर सुटल्यानंतर नागपूरमध्ये तरी पुन्हा तशाच प्रकारे लोकांना फसवता येणार नाही
, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथे पैशांची कमी नाही. फक्त पैसे कसे कमवायचे याची अक्कल लागते. ही अक्कल त्यांच्याकडे आधीपासूनच होती. नागपूरमध्ये त्यांनी ती पाजळली होती. त्यामुळे मुंबई
, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये या दाम्पत्याने दुसऱ्या नावाने वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून आपले झटपट पैसा कमावण्याचे आणि लोकांना चुना लावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याने ठाणे, मुंबईतील मुलुंड आणि नवी मुंबईतील खारघर भागातील आणखी सुमारे ५०० जणांना कोट्यवधीना गंडा घातल्याचे आता उघडकीस आले आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील खारघर पोलिसांनी या दाम्पत्यापैकी जयंत झांबरे-पाटील याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
झांबरे दाम्पत्याने २०१२ मध्ये नागपूरमध्ये जे. एस. फायनान्स अॅण्ड कॅपिटल सर्व्हिसेस नावाची कंपनी स्थापन करून त्याद्वारे गुंतवणुकीवर दर महिन्याला सहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले होते. मात्र कंपनीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. तसेच गुंतवणूकदारांची मुद्दलही परत केली नाही. अशा पद्धतीने या दाम्पत्याने ५० कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याचे त्या वेळी तपासात आढळले होते. त्यामुळे २०१२ मध्ये फसवणूक झालेल्या तब्बल २९५ गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर नागपूरमधील प्रतापनगर पोलिसांनी झांबरे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्यानंतर जयंत झांबरे हा फरार झाला होता. त्यामुळे नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने प्रथम त्याची पत्नी वर्षा झांबरे हिला अटक केली होती
, तर तीन महिन्यानंतर पोलिसांनी जयंत झांबरे यालाही अटक केली होती. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेने तपास पूर्ण करुन डिसेंबर २०१२ मध्ये महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबध संरक्षण कायद्यानुसार विशेष न्यायालयात झांबरे दाम्पत्याविरोधात दोन आरोपपत्रे दाखल केली होती. तसेच झांबरे दाम्पत्य व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली मालमत्ता देखील जप्त केली होती. त्यानंतर हे दाम्पत्य जामिनावर बाहेर आल्यानंतर जयंत झांबरे याने जयंत पाटील या नावाने फिनिक्स वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस नामक ठाणे व मुलुंडमध्ये नवीन कंपनीची सुरुवात करून कार्यालय थाटले.
या ठिकाणी देखील त्यांनी गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना आपल्या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. याला बळी पडून शेकडो लोकांनी फिनिक्स वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये लाखो रुपये गुंतवले. ठाणे व मुलुंडमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर या दाम्पत्याने खारघरमधील लॅन्डमार्प इमारतीत व्हेंचुरा सोल्युशन सर्व्हिसेस या नवीन नावाने ट्रेडिंग कंपनीची सुरुवात करून या ठिकाणी देखील गुंतवणूकदारांना कमी दिवसांत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना आपल्या कंपनीत लाखो रुपये गुंतवण्यास भाग पाडले.
झटपट पैसा या स्कीमचा एक फंडा असा असतो की
, सुरुवातीला लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा ठरलेला पैसा दिला जातो. त्यामुळे लोकांचा पटकन विश्वास बसतो. संबंधित लोक स्वतःच आणखी पैसे गुंतवतात, तसेच इतरांनाही पैसे गुंतवायला प्रेरित करतात. अशा प्रकारे माऊथ पब्लिसिटी होत जाते आणि संबंधितांकडे पैशांचा ओघ वाढतो. या दाम्पत्यानेही सुरुवातीला काही गुंतवणूकदारांची रक्कम परत केली, मात्र कालांतराने त्यांनी पैसे देणे बंद केले. तसेच आपले कार्यालय देखील बंद केले. त्यामुळे नवी मुंबईतील काही गुंतवणूकदारांनी झांबरे दाम्पत्याची अधिक माहिती काढली असता, या दाम्पत्याने नागपूर आणि इतर भागांतील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही गुंतवणूकदारांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी जयंत झांबरे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. झांबरे दाम्पत्याने फसवलेल्या ठाणे व नाशिकमधील गुंतवणूकदारांनी या दाम्पत्याविरोधात लेखी तक्रारी दाखल केल्या असून त्या पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे.  या प्रकरणात झांबरे याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे आढळून आल्यास तिलादेखील अटक करण्यात येणार आहे.
परदेशात नोकरीच्या बहाण्याने गंडा
एकीकडे दामदुप्पट पैसे करण्याचे आमिष दाखवून लोकांना लुटले जात असतानाच काही लोकांचे रॅकेट परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांनाही फसवत असल्याचे दिसून येत आहे. अशा यापूर्वीही अनेक घटना घडल्या होत्या. आताही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ६०हून अधिक बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा जुहू पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे. या रॅकेटने आतापर्यंत सुमारे वीस लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कल्याण येथे राहणाऱ्या एका शेफची ओळख त्याच्या मित्राने जुहू येथील एका महिलेशी करून दिली. ही महिला परदेशात नोकरी मिळवून देते असे त्याच्या मित्राने सांगितले. त्यानुसार या शेफ तरुणाने या महिलेशी संपर्क केला. तिने जुहू येथील हॉटेलमध्ये त्याला भेटण्यास बोलावले. या हॉटेलमध्ये काही तरुण आधीच उपस्थित होते. महिलेच्या वतीने अब्दुल आणि एजाज हे दोघे त्या ठिकाणी होते. परदेशात नोकरीसाठी बरीच मोठी प्रक्रिया असून ती पूर्ण करण्यासाठी ९० हजार रुपये खर्च येईल आणि दहा हजार तत्काळ द्यावे लागतील
, असे त्यांनी सांगितले. शेफ तरुणाने दिलेल्या बँक खात्यामध्ये ५० हजार रुपये भरले. वर्ष उलटले तरी नोकरी मिळाली नाही म्हणून या तरुणाने संपर्क केला, परंतु या महिलेचा नंबर बंद होता. अब्दुल आणि एजाज हे दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल देशमुख आणि पोलीस शिपाई कमलेश सोनावणे यांच्या पथकाने अब्दुल आणि एजाजला अटक केली. ती महिला व या दोघांनी १८ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. दोघांनाही न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून जुहू पोलीस फरार महिलेचा शोध घेत आहेत. या तिघांनी फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे..................

Comments